Tuesday, August 14, 2007

मी आणि "जिबली'


उद्या पंधरा ऑगस्ट, आपला स्वातंत्र्य दिन. आणि मला आतापासूनच जिलबीचे वेध लागलेत. मस्त केशरी रंगाची गोड जिलबी! माझ्या खाद्ययात्रेत जिलबी अगदी महत्त्वाची आहे. लग्नातली जिलबीही मी चापून खातो, डायबेटिस असलेल्यांसाठी पाकात न सोडलेली फक्त तळलेली जिलबी असते ना, तीही सुरेख लागते. आम्ही तीही सोडत नाही, यावरून काय ते ओळखा. मी अगदी लहान म्हणजे दोन-अडीच वर्षांचा असतानाची ही गोष्ट आहे. अर्थातच आई-बाबांनी सांगितलेली. आम्ही काश्‍मीरला गेलो होतो. तेव्हा तिथे अतिरेकी नसले तरी साडेसात आठला दुकानं बंद व्हायची. तर अशाच एका रात्री दहाच्या सुमारास मी सूर लावला, "मला जिबली पायजे...' झालं, बिस्कीटं, चॉकलेटं देऊन झाली; पण सूर थांबेना. मला जिलबीच हवी होती. बाबांच्या मित्रांचा ग्रुप होता. रात्री निघाले सगळे बाहेर "जिबली' शोधायला. एका दुकानदाराला हातापाया पडून उठवलं. जिलबी आणली. ती मी खाल्ली. मगच झोपलो. घरात माझ्या पोटाचा विषय निघाला (तो रोजच आणि किमान तीन वेळा निघतो... त्यावेळी मनाला काय वेदना होतात, ते सूज्ञांना ठावकीच असेल.) की जिलबीचा विषय हटकून निघतोच निघतो. "हा तेव्हापासूनच असा...' इति मातोश्री!
तर विषय जिलबीचा होता. उद्या सकाळी उठायचं. झेंडावंदन झालं, की कुमठेकर रस्त्यावरच्या इंदौर फरसाणवाल्याकडून (कुलकर्णी पेट्रोल पंपाच्या मागच्या बाजूला) चांगली साजूक तुपातली एक किलो गरमागरम जिलबी आणि ढोकळा घ्यायचा. नाष्टा तोच आणि जेवणात पक्वान्नही तेच. जिलबी आणि ढोकळ्याशिवाय पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे दोन राष्ट्रीय सण साजरेच होऊ शकत नाहीत. पूर्वी बाबा फापडा आणायचे. बाजीराव रोडवर नूमविच्या शेजारी बॉम्बे फरसाण म्हणून अगदी लहानसं दुकान होतं. ते पापडीसाठी एकदम फेमस... त्याच्याबरोबरची चटणी एकदमच टॉप. त्या पापडीमध्ये चटणी भरायची आणि हाणायची. क्‍या बात है...
याच जिलबीवरून आठवलं. मागे महिनाभर राजस्थानात हिंडत होतो. बाटी, कचोरी आणि आलू पराठा (बदबद अमूल घालून) खाऊन कंटाळा आला होता. आम्ही कोट्यामध्ये होतो. रात्री झोपताझोपता हाच विषय झाला. सकाळी उठून लॉजच्या गॅलरीत गेलो, तर खाली पोह्यांची गाडी लागली होती. तातडीनं पळत पळत खाली गेलो. (शंकेखोरांसाठी : दात घासून झाले होते) पोहे किती प्रकारचे असावेत? गोड पोहे, साधे पोहे, तिखटाचे पोहे, तर्री टाकलेले पोहे... सगळे एक एक प्लेट हाणले. पोहे संपताहेत तोच त्यानं इमृती तळायला घेतली. (जिलबीच ती... गर्द केशरी रंगाची आणि वळ्यावळ्या असलेली) आहाहा... दिवसाची सुरवातच गोड तर दिवस किती गोड गेला असेल कल्पना करा...
असो, मुद्दा जिलबीचा होता. तो संपला. उद्या भेटूया इंदौर फरसाणवाल्याकडे सकाळी 8 वाजता...

Monday, August 6, 2007

पाणी-पुरी गोड असते का तिखट?

पाणीपुरी म्हणलं की पुदिना-हिरव्यागार मिरचीच्या दर्जेदार पाण्यानं भरलेला माठ, रटरट उकळणारा रगडा, चिंचेचं पाणी अशी एक एक गोष्ट डोळ्यासमोर नाचू लागते.


चव आठवली की ठरलेल्या पाणी पुरीच्या गाडीवर न थांबता पुढे जाऊ शकणारे नसावेतच बहुतेक.एक गोड, एक मिडियम, एक तिखट म्हणल्यानंतर पुरीबरोबर भैय्याचा हातही कोपरापर्यंत पाण्यात बुडून बाहेर येतो. गोड तिखट आंबट अशा तीव्र चवीचं रसायन पुरीबरोबर तोंडात जातं. नाका-तोंडातून पाणी येतं. कुठल्या हातानं नाक पुसू अन्‌ डोळ्यातलं पाणी पुसू अशी भयंकर गोची होते. पाणी-पुरी गोड असते का तिखट? असं खरंच काही सांगता येणार नाही. कारण, पाणी तिखट आहे असं म्हणेपर्यंत पुरीच्या कोपऱ्यातलं चिंचेचं पाणी अलगद जिभेवर पसरतं. आणि मग पुढची पुरी अलगद तोंडात जातेच.चवीपुढे, पाणी कुठलं वापरलं असावं, माठ धुतलाय का नाही, या भैय्यांनी हात कधी धुतलेत अशा गोष्टी एकदम गौण ठरतात. जगात दोन प्रकारची माणसं असतात. एक पाणी-पुरी आवडणारी आणि दुसरी न आवडणारी. सुदैवानं दुसऱ्या प्रकारची माणसं अजून भेटायचीयेत. ती भेटेपर्यंत तरी कल्पना भेळेशेजारची तर कधी लक्ष्मी रोडवर अभ्यंकर ऑप्टेशियन्सच्या जवळची, तर नारायण पेठेतली व्यास पाणी पुरी अशी एक- एक दर्जेदार ठिकाणं पाणी-पुरी या विषयाचा व्यासंग वाढवतायंत.

Friday, August 3, 2007

माझी तिखट गोड खाद्ययात्रा...


आपल्याला तोंड दिलंय ना, ते चावण्यासाठी (दोन्ही अर्थानं) यावर माझा भक्कम विश्‍वास आहे. त्यामुळे कुठे, कोणत्या वारी आणि किती वाजता काय मिळतं, याकडे अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणं आणि त्यानुसार त्या त्या वेळी तिथे तिथे जाऊन त्यावर ताव मारणं हे आद्य कर्तव्य ठरतं. (जिज्ञासूंनी येऊन पोटाचा घेर मोजावा!) त्यातच नोकरीच्या निमित्तानं बरीच भटकंती झाली. त्यामुळे तिथे मिळणाऱ्या पदार्थांचाही शोध घेतला गेला. (हे वाक्‍य वाचल्यानंतर मी परदेशात वगैरे फिरलो असेन, असे वाटण्याचा संभव आहे. (मनात तीच इच्छा आहे!) पण आमची धाव भारताबाहेर गेलेली नाही.) ब्लॉगच्या निमित्तानं या साऱ्याला उजाळा देण्याची संधी मिळते आहे.
खाण्याची आवड असली, तरी स्वयंपाकाबाबत कायमचा कंटाळा! म्हणजे बॅचलर असतानाही "चहा' या विषयापुढे धाव गेली नाही. कधीकधी मेसचा कंटाळा आला, तर मित्रांनी मिळून केलेले भाताचे विविध प्रकार! (लावलेली वाट...) आणि शोधलेले शॉर्टकट. सहज आठवलं. मी बेळगावला असताना नारळाची बर्फी करायचं ठरवलं! कृती अगदी सोपी वाटली. नारळ खोवायचा, साखरेचा पाक करायला ठेवायचा, त्यात खोवलेला नारळ घालायचा, ते मिश्रण आटवायचं आणि ताटात पसरून थंड करायचं! आहे काय त्यात? (त्यावेळी लग्नं झालं होतं. त्यामुळे एवढी आयुधं घरात होती; पण बायको पुण्याला आल्यानं आम्ही बॅचलरच होतो.) मी तयारीला लागलो. नारळ खोवण्याची माझी स्टाईल पाहून एक मित्र मदतीला धावला. मग आम्ही दोघांनी मिळून तीन नारळ खोवले. अर्धा किलो साखर गॅसवर ठेवली. जळाल्याचा वास आल्यानंतर त्यात पाणीही घालायचं असतं हे समजलं. (च्यायला ***, नीट वाचायला काय होतं तुला? इति मित्र) एकदाचा पाक झाला. त्यात नारळ घातला. आम्ही पिक्‍चर बघत पसरलो. होता होता तीन एक तास झाले. मिश्रण काही घट्ट होईना. आता गॅस संपतो की काय, अशी भीती वाटायला लागली. अखेरीस चार तासांनंतर ते मिश्रण गॅसवरून उतरविण्यात आले. ताटात घालून थंड करण्यासाठी ठेवण्यात आले. (मरूदे... बघू गार झाल्यावर!) दोन दिवसांनंतरही ते तसंच थबथबीत होतं! या अनुभवावरून लक्षात आलं असेलंच, की आमचा करण्यापेक्षा खाण्यावर भर.
काल याच विषयावर विचार करता करता लक्षात आलं. (मी विचार करतो...!) ही खाद्ययात्रा शाळेपासूनच सुरू झाली. मी आधी नवीन मराठी (पहिली ते चौथी), नंतर रमणबाग. त्यातील नवीन मराठी सोडून देऊ. रमणबागेच्या बाहेर सूर्यकांत कुल्फी, उन्हाळ्यात काकडी, शाळेच्या बाहेर कॉर्नरला असलेल्या बेकरीतला क्रिमरोल आणि चौकात समोर असलेल्या दवे स्वीटमार्टमधले सामोसे (सध्या तिथे बेकरी नाही. कुल्फी आणि समोसे मिळतात. त्यांची चव अजूनही तशीच आहे.) अशी खाद्ययात्रा सुरू झाली. तिचा प्रवास आता "स्टार्टर' (पक्षी : चकणा. यातही खूप सुंदर प्रकार आहेत, आठवताहेत. त्याविषयी पुन्हा केव्हातरी.) पर्यंत येऊन ठेपलाय.
याच प्रवासाच्या सुग्रास आठवणींमध्ये मी रमणार आहे, तेही तुम्हाला बरोबर घेऊन. (काय दिवस आलेत.... असं वाटलं ना?) ही फक्त खाद्य यात्रा नाही. त्याबरोबर तिथल्या आठवणी, वातावरण यांचाही वेध घेण्याचा छोटासा प्रयत्न. मधेमधे काही पदार्थांच्या समजलेल्या रेसिपिज. (बर्फीसारख्या नाहीत!) आता इथेच थांबतो. बाकीचं पुन्हा केव्हा तरी...

Thursday, August 2, 2007

खाण्यासाठी जन्म आपुला...


रविवारी सकाळी पेपरचा गठ्ठा आणि चहांची आवर्तनं झाली की मग भूकेसारखं होतं. घरी अर्थातच काही करायचं नसतं...रविवार म्हणून....मग गाडीची चाकं वळतात "शबरी'कडे.
तुकाराम पादुका चौकातच, झाडांच्या सावलीत शर्वरी-शबरी ही हॉटेल्स आहेत. इथं शनिवार रविवारी अमर्यादित नाश्‍ता मिळतो. आम्हाला ही जागा कळली ती नवऱ्याच्या मित्रामुळं. एकदा कुठे जमूया...म्हणत असताना त्यानं सांगितलं की अशी जागा आहे जी कळल्यावर थोडे दिवस मी कोणालाच तिथे इतका छान नाश्‍ता मिळतो हे सांगितलं नव्हतं...अनेक शनिवार-रविवार आम्ही तिथे चेपलं, आणि मग मित्र-मैत्रिणींना सांगायला सुरुवात केली...तिथे गेल्यावर पटलंच आम्हाला...
पदार्थांची चव अप्रतिम, शनिवार-रविवारी सकाळी 9 ते 11 वेळात शबरीत पोहे, खिचडी, इडली, डोसे, कटलेट, साबुदाणा वडे, मिसळ, पनीर रोल, उत्तप्पा, थालिपीठ, साजूक तुपातला, काजू घातलेला शिरा हे सारं मिळतं...शिवाय केलॉग्ज, ब्रेड टोस्टही...इतकंच नाही तर सेंटर ऑफ ऍट्रॅक्‍शन आहे फळं आणि मागणीनुसार फळांचा ताजा रस...अमर्यादित...फक्त 69 रुपयात. तिथं सर्वात मजा येते ती ताट भरून, घेऊन बसल्यावर पदार्थ बघितल्यावरच, त्या दर्शनानंच मन भरतं...सगळ्या पदार्थांची चव खरेच छान असते. तृप्तीचा अनुभव देणारी...
ताट जरा रिकामं होत आलं की तिथला व्यवस्थापक स्वतः थालिपीठ, कटलेट घेऊन येतो. गरमा गरम...आणि चक्क आग्रह करतो. टेस्ट तरी कराच वगैरे...पुण्यात कुठल्या हॉटेलात आग्रहानं काही वाढलं जातं ही कल्पनाच किती वेगळी (?) आणि किती छान वाटते म्हणून सांगू...
तिथे नाश्‍ता कम्‌ जेवण झालं की बाहेर पानवाल्याशी भेट चुकवण्यात अर्थ नाही...तिथलं पान तोंडात टाकून वळेपर्यंत संपतं, इतकं देखणं असतं... रविवारची सुरुवात झकास होते...आणि त्याच त्या ठिकाणाचा कंटाळा येत नाही...

Tuesday, July 31, 2007

हा उपदव्याप आहे फक्त 'पोटा'साठी!


पुणं तिथं काय उणं म्हणतात. खरंय महाराजा. खरंच पुण्यात काय नाही? गर्दी आहे, रस्त्यावर खड्डे आहेत, सिग्नल चुकवून पळणारे वाहनचालक आहेत. जाऊद्या. पोटात कावळे कोकलायला लागले की बुद्धी अशी बहकते. इथं आपण गप्पा मारणार आहोत त्या फक्त आणि फक्त खाण्याच्या! पूर्वी पुण्यातल्या खानावळी फेमस होत्या. आताही आहेतच. पण पुणं त्यापेक्षाही वाढलंय. (सदाशिव पेठेत 'पुरेपुर कोल्हापूर' येणं हेच पुणं वाढल्याचं आणि बदलल्याचंही लक्षण आहे. आम्ही पुण्यात भन्नाट हिंडतो. पुणेरी मिसळीपासून मालवणी मासळीपर्यंत काहीही आम्हाला त्याज्य नाही. जे काही आवडेल ते पूर्णब्रह्म समजून खायचे. अर्थात आमच्याही काही मर्यादा आहेत. एकाच वेळी सर्व पदार्थ चाखून पाहणे शक्य नाही. पण किमान इथे मिळणारय़ा चांगल्याचुंगल्या पदार्थांची आणि ठिकाणांची माहिती एकत्र मिळाली तर? म्हणून या ब्लॉगगप्पा. आम्हाला माहिती असणारे चांगले खाऊचे धक्के अर्थात फुड जॉईंटस् आम्ही तुम्हाला सांगू. तुम्ही तुमची माहिती शेअर करा. केवळ पदार्थच नव्हे तर ते देणारया एखाद्या ठिकाणाची दुसरी काही वैशिष्ट्येही आम्हाला आवडतील ऐकायला. एखादी चांगली रेसिपी माहित असली तरी सांगा. शेवटी चांगल चविष्ट खायला आम्हालाही आवडतं म्हटलं! चला तर मग. भेटूया वारंवार..